Tuesday, October 22, 2013

रोहिणीचे पत्र - २

Subject: RE: मैत्री करायची का?
    Date: Fri, 22 Oct 2013 07:00:00 +0530
   From: Rohini Dixit <rohinidixit79@gmail.com>
       To: Rohit <rohitcreative88@gmail.com>

रोहित यांस,
नमस्कार.

तुम्ही छान पत्र लिहिता.  मला इतकं मोठ पत्र कुणी पहिल्यांदाच लिहिले आहे.  तुमचे पत्र वाचून मला जे काही जाणवले ते मी स्पष्टपणे सांगणार आहे.  तसे करण्यात तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाही, ते वाचून अपसेट न होता माझ्या मुद्यांवर तुम्ही विचार करावा अशी माझी इच्छा आहे.

तुम्ही म्हणता की तुम्हाला मी आवडते.  माझ्या मते हे आवडणे म्हणजे जसे आपल्याला दुकानात ठेवलेली एखादी वस्तू आवडते तसे आहे असे मला वाटते.  मला सुद्धा कधी कधी दुकानातली एखादी पर्स किंवा ड्रेस खूप खूप आवडतो आणि मग दिवस दिवस मी त्याचाच विचार करत असते.  तो ड्रेस किंवा ती पर्स मिळवणे याचा मला ध्यास लागतो.  तुम्ही म्हणता तुम्हाला मी आवडते त्यात असेच काही तरी झाले आहे असे मला वाटते.  मी असे का म्हणतेय ते वेगळ्या शब्दात सांगते.  माझ्या फक्त सकाळच्या पाच मिनिटे दिसण्यावर तुमची आवड आधारित आहे असे मला कळतेय.  माझे बाह्य रूप ज्याला तुम्ही सुंदर म्हणताय ते दुरून काही वेळ पाहून तुम्हाला तसे वाटते आहे असेही दिसते आहे.  तुम्ही मला ओळखत नाही, तुम्हाला माझे बोलणे वागणे, चांगल्या वाईट सवयी, यातले काही माहित असल्याची शक्यता कमी दिसते.  आपण प्रदर्शनातून एखादी पुंगी घरी आणतो आणि ती घरात आल्यावर चालतच नाही याचा अणुभव तुम्हालाही आला असणारच.  तसाच माझ्याशी अधिक ओळख झाल्यावर माझे वागणे माझे विचार समजल्यावर तुमचे झाले म्हणजे?  तुम्हाला मला ओळखून समजून मग तुमची आवड ठरवता आली असती तर मला त्यात काही खोल तत्थ आहे असे वाटले असते.

तुमचे सध्याचे विचार म्हणजे कदाचित तुम्हाला स्वतःला आयुष्यात हवी असलेली सखी ची जागा भरणारी एक व्यक्ती हवी आहे आणि मी दिसायला तुम्हाला बरी वाटली म्हणून तुम्ही तुमचे आवडणे माझ्यावर प्रक्षेपित करताय असे मला वाटते आहे.  माझ्याही काही मैत्रीनींना बॉयफ्रेंड्स आहेत आणि त्यांना चिडवणे मला पण आवडते पण फक्त त्यांना बॉयफ्रेड्स आहेत म्हणून आपणही फक्त पाहून आवडेल असा कोणीतरी बॉयफ्रेंड निवडून घोषित करावा इतके पोकळ आयुष्य जगावे असे मला वाटत नाही.

मी तुम्हाला मैत्री करायची का ते विचारले ते या कारणासाठी की आपल्याला विचारांची देवाण घेवाण करता यावी.  दिसायला तुम्ही पण स्मार्ट आहात म्हणून मला लगेच तुम्ही आवडता असे मी म्हणणार नाही.  तसे पाहिले तर मला अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन पण आवडतात, तसे दिसण्यात तुम्ही पण छान दिसता. तसेच आवडणे आपण पाहत असू तर ते स्वतःपुरते वस्तू आवडावी तसे आवडणे ठरते हो ना?  त्या आवडण्यात दुसऱ्या व्यक्तीचा विचार कुठेच नाही. 

मी देवभक्त आहे, आणि मला आवडणारी व्यक्ती नास्तिक असेल तर मला त्या व्यक्तीशी मैत्री करायला त्रास होईल.  मग असे साधे साधे गुण जुळवणे महत्वपूर्ण नाही का?  आपण मेल मधे एकमेकांचे विचार जाणून घेतलेत आणि आपली स्वप्ने आपले जगण्याची तत्वे एकमेकांना सांगितली तर आपण किती पूरक आहोत किंवा नाही आपण किती चांगले मित्र होऊ शकतो हे लक्षात येईल असे मला वाटले म्हणून मी तुम्हाला मैत्री कराल का असे लिहिले होते.  तसे केल्या नंतर जर आपल्याला काही गोष्टी पटल्या नाहीत तर तसे सांगायची मुभा आपल्यामधे असावी म्हणूनच मी मैत्री करायची का असे म्हटले.  मैत्रीमधे आपण मोकळेपणाने काय वाटले काय समजले काय नाही आवडले ते सांगू शकतो असा मोकळेपणा असावा.

तुम्ही खूप भावनात्मक मेल लिहिली आहे आणि मी तुमच्या उत्साहावर विरजण घालतेय असे तुम्हाला कदाचित वाटेल.  तुम्हाला दुखवायचा माझा काहीच हेतू नाही हे समजून घ्या.  पण मी पण एक जिवंत व्यक्ती आहे आणि मला पण एक मन आहे याची जाणिव मला तुम्हाला फक्त द्यायची होती.  आणि आपली मैत्री क्षणीक दिसण्यावर आधारित नसावी असे मला वाटते हे तुम्हाला सांगायचे होते म्हणून मी स्पष्टपणे तसे लिहिले आहे.  मी अजूनही म्हणते की मला मैत्री करायला आवडेल.  या मैत्रीमधे आपण फक्त स्वतःचा नाही तर दोन माणसांचा विचार करतोय.  आपण विचारांची देवाण घेवाण करूया.  त्यातून काय काय आवडते काय नाही ते कळेल आणि आपली मैत्री पुढे काय करायचे किंवा होईल याचा मार्ग ठरावी असे मला वाटते. इतकी संधी स्वतःला आपण द्यावी असे मला वाटते.  पुढचा मार्ग काय असावा ते ठरवण्याची संधी आपल्याजवळ असावी.

विचार करा आणि मला कळवा.

रोहिणी

No comments:

Post a Comment