Sunday, October 20, 2013

रोहितचे पत्र - १

Subject: RE: मैत्री करायची का?
    Date: Fri, 17 Oct 2013 22:25:10 +0530
   From: Rohit <rohitcreative88@gmail.com>
       To: Rohini Dixit <rohinidixit79@gmail.com>

प्रिय रोहिणीस,
सस्नेह नमस्कार!

तुला सरळ एकेरी संबोधन करतोय कारण जे मी तुला सांगणार आहे ते सांगताना तुला अहो जाहो करणे कसेतरीच वाटेल.  माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक मुली माझ्या समोरून गेल्या, त्यातल्या काही आवडल्याही होत्या पण तुला जेव्हा मी घरासमोरच्या क्लास ला येताना पाहिले त्या दिवशीपासून माझे मन तुझ्यापाशी येऊन स्थिर झालेले आहे.  तू दिसल्यापासून मला कोणतीच मुलगी इतकी सुंदर दिसली नाही की मला क्षणभरही तिचा विचार करावा लागेल किंवा करता येईल.  थोडक्यात काय तुझ्या चेहऱ्यात जादू आहे आणि ती माझ्यावर पूर्णतः झालेली आहे आणि माझे विचार तुझ्यावर येऊन स्थिरावले आहेत.

तू म्हणतेस की मी तुझ्याकडे पाहू नये.  तुला सांगतो दिवस उजाडल्यावर जेव्हा तुझा चेहरा पाहतो ना, जेव्हा तुझ्या चेहऱ्याच्या सुंदरतेच्या लाटांनी चिंब होतो ना त्यानंतर दिवस फुलपाखरासारखा अलगद जगता येतो.  तुझ्या त्या सकाळी पाहिलेल्या हसऱ्या चेहऱ्याच्या आठवणीत मला एक विलक्षण शक्ती मिळते आणि त्या शक्तीच्या जोरावर मी दिवस साजरा करतो.  तुझ्या कडे न बघणे म्हणजे माझ्यासाठी शिक्षा ठरणार आहे.  पण मला कळतेय की तुला त्याचा त्रास व्हायला नको.  मी या गोष्टीची काळजी घेतली की तुझ्या मैत्रीणींचे माझ्या हालचालीवर लक्ष जायला नको, तर मग मला तुझ्याकडे बघण्याची परवानगी आहे ना?  आता तुला न बघणे म्हणजे कसले जगणे असे वाटते आहे.

तू पाहताक्षणीच मला आवडलीस.  तुझ्याशी मैत्री करावी, तुझ्याशी बोलता यावे म्हणून मी कितीतरी दिवस संधी शोधत होतो.  तुमच्या सहलीला मी समीरला विचारून त्याला मदत करायला म्हणून बरोबर आलो त्यामागे तुला भेटणे ही एकमेव इच्छा होती.  इतकेच वाटत होते की तुझ्याशी बोलावे तुला मनातले सांगावे पण त्या दिवशी मैत्रीणींच्या गराड्यामुळे आणि पहिल्याच ओळखीत सगळे सांगावे कसे या संकोचाने मला काही सांगता आले नाही.  तू मला मेल करून जी संधी दिलीस त्यामुळे तुला माझ्या मनातले सांगून टाकतोय. 

माझे बाबा नोकरी करतात, आई घर सांभाळते.  मी मेकॅनिकल इंजिनियरींग चा डिप्लोमा केलेला आहे आणि सध्या मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्रीमधे सेल्स डिपार्टमेंट मधे नोकरी करतो.  त्याचबरोबर मी पार्ट टाईम इंजिनियरिंग ला सुद्धा एडमिशन घेतलेली आहे.  मी काय करतो विचारलेस म्हणून तुला हे सगळे सांगितले आहे.  खूप मोठी नोकरी नाहीये तरीही खूप शिकून मोठे व्हायचवी स्वप्ने आहेत. 

तुला एक आवर्जून सांगावेसे वाटते की तू मला आवडलीस ते तू पहिल्यांचा दिसल्यापासूनच, बरेचदा मला स्वतःला पण प्रश्न पडतो की मला तू का आवडतेस आणि असे मनातून उत्तर येते की तू दिसल्यापासून हेच वाटत आले आहे की याहून सुंदर कोणी असूच शकत नाही.  मला तू आवडतच होतीस आपल्याला काय आवडते हे ती व्यक्ती दिसल्याशीवाय कळू शकत नाही, तू समोर आलीस आणि मनाला आपोआप कळले की आपल्याला आवडते ती हीच आहे.  तू खूप सुंदर आहेस.  तुझ्याशिवाय सुंदर या जगात कोणीच नाही.  लोक जेव्हा इतर मुलींना सुंदर म्हणतात ते त्यांना कसे सुंदर म्हणू शकतात हेच मला कळत नाही.  तुझे सौंदर्य अवर्णनीय आहे. 

तू मला मैत्री करूया अशी मेल पाठवली, पण माझ्या मनातले तुला न सांगता मैत्री करणे हे मला सहनच झाले नसते म्हणून तुला जे मनात आहे ते सांगतोय.  मला तू खूप आवडतेस.  तुझ्याशी बोलायला तुझ्याशी मैत्री करायला तुला भेटायला तुझ्याबरोबर वेळ घालवायला मला खूप आवडेल.  माझ्या आयुष्यातले अनुभव आणि क्षणांबद्दल तुला सांगायला आवडेल, तुझ्या आयुष्यात तुला मिळालेले अनुभव ऐकायला मला आवडेल.  मला तू आवडतेस म्हणजे तुला लगेच काही वाटले पाहिजे किंवा तू लगेच उत्तर दिले पाहिजे असे नाही.  पण तुला काय वाटते याची मला खूप उत्सुकता आहे आणि मी जीव मुठीत धरून तुझ्या उत्तराची वाट पाहणार आहे हे ही खरे आहे. 

उत्तराची आतुरतेने वाट पाहणारा
रोहित

No comments:

Post a Comment